दिल्ली, प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी : पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह 27 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सूरू आहे, पावसाच्या तडाख्यात आतापर्यंत 22 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि पंजाबसह उत्तर-पश्चिम भारतातील काही भाग वगळता संपूर्ण देशात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि दक्षिण आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांसह सर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या काळात वीज पडून आणि पावसाशी संबंधित इतर घटनांमुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
आयएमडीचा महाराष्ट्राला इशारा
महाराष्ट्रात मान्सूननं सर्वदूर हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पावसाचा जोर मंदावला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला असून, राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून (IMD) आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात अजूनही म्हणावा असा पाऊस न झाल्यानं शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईचं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.