प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : विठूरायाच्या भेटीची आस वर्षभर मनात असते, परंतु आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती वारीची. आता वारी अगदी दाराशी येऊन ठेपलीये, असं म्हणालाय हरकत नाही. त्यामुळे वारकरी बांधवांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. येत्या 28 जून रोजी श्री संत तुकाराम महाराजांच्या
पालखीचं देहूतून प्रस्थान
होईल. त्यासाठी संस्थानाकडून
जय्यत तयारी
सुरू आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीनं नवी वेलवेटची छत्री बनवण्यात आली आहे. पुण्याच्या भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ आणि त्यांच्या मित्रमंडळींनी तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास चेन्नईहून ही छत्री तयार करून घेतली आहे. विशेष कारागिरांचे हात या छत्रीला लागले आहेत.
हेही वाचा :
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख! महाराजांच्या पालखी मुक्कामाची आकुर्डीत जय्यत तयारी
छत्रीवरील संपूर्ण काम हे हातानंच करण्यात आलंय, शिवाय त्यात वेलवेट कापड वापरलेलं असल्यामुळं छत्री अतिशय सुंदर दिसतेय. त्यावरील अब्दागिरी, गरूड टक्के, रेशमी ध्वज पताका, इत्यादी विविध नक्षीकाम भाविकांचं लक्ष वेधून घेईल. तसंच छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्रही विणून घेतली आहेत.
छत्रीमधील काड्या या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनवलेल्या आहेत. लोखंडी तारांचा वापर केलेला नाही. तसंच छत्री पकडण्यासाठी 8 फूट उंचीचा एसएस लोखंडी भक्कम पाइप वापरला आहे. छत्रीवर पितळी कळस बसवण्यात आला असून ही संपूर्ण छत्री अतिशय आकर्षक आहे. पालखी सोहळ्यात कोणतीही कसर राहायला नको, दरवर्षीप्रमाणे यंदाही वारी अगदी जल्लोषात पार पडायला हवी, यासाठी संस्थानच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत. देहू संस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी याबाबत माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.