पुणे: कोयता गँग, ड्रग्ज प्रकरण यामुळे पुणे चर्चेत असतानाच शहरातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये. येरवडा परिसरात तरुणाने बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांवर धारदार हत्याराने हल्ला केल्याची एक घटना घडली आहे. मात्र घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. शहराच्या विस्ताराबरोबरच गुन्हेही वाढत आहेत. येरवडा परिसरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांची धारदार शस्त्रानं खून केला. आरोपी तरुणाची बहीण प्रियकरासोबत पळून गेली होती. त्याच रागातून आरोपीने बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांना संपवलं.
येरवडा परिसरात आरोपीची बहीण व तिच्या प्रियकराचं कुटुंब शेजारीच राहतात. त्यामुळेच त्या शेख व लहाडे कुटुंबातील दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र हा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटुंबियांना मान्य नव्हता. घरच्यांच्या विरोधामुळेच ते दोघंही घरातून पळून गेले. याचा राग आल्यामुळे आरोपी इस्माइल शेखने धारदार शस्त्राने बहिणीच्या प्रियकराचे वडील कट्टू यांच्यावर वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली.
घटना घडल्यानंतर काही तासांमध्येच पोलिसांनी 25 वर्षीय आरोपी इस्माइल शेखला ताब्यात घेतलं. विरोध करूनही बहीण प्रियकरासोबत पळून गेल्याने इस्माइल नाराज झाला व त्यातूनच त्याने हे कृत्य केलं. शेजारी राहणाऱ्या मुलाने फूस लावून बहिणीला त्याच्यासोबत पळवून नेलं म्हणून आरोपीनं मुलाच्या वडिलांचा खून केला, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
भिन्न धर्मीय लग्नांसाठी सहसा कुटुंबीय तयार होत नाहीत. विशेषतः ग्रामीण भागात याला फार विरोध होतो. त्यातूनच मारहाण, हत्या, खून असे गुन्हे घडतात. पुण्यात सध्या ड्रग्ज प्रकरण व कोयता गँगची दहशत असताना अशा गुन्ह्यांच्या घटनांनी पुणे पुन्हा पुन्हा हादरते आहे. या प्रकरणामुळे येरवडा परिसरात खळबळ माजली आहे. प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याबाबत आणखी चौकशी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.